Wednesday, August 7, 2024

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वरील श्रद्धा व विश्वास असल्याने त्यांच्याच नावाने 1992 साली श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेची स्थापना करून गेली 30 वर्षे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहेत.संस्था स्थापनेसाठी कै.राघवराव पवार,कै.रमेश आरोटे,मिलिंद उमराणी, जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर,एम.के.बारेकर,नंदकुमार बेल्हेकर,सुमंत वैद्य,हबीब मणियार,शशिकांत ओहरा,देविदास शेलार,श्रीराम पन्हाळे ,चंद्रकांत बांगर यांनी बहुमोल मदत केली.शाळा सुरु करण्यासाठी स्वतःची जागा,इमारत नसल्याने सहकारी गोडाऊन,म्हशींच्या गोठ्यात मुलींची शाळा सुरू केली. परंतु अनधिकृत शाळा सुरू केल्याप्रकरणी सदर मुलींची शाळा शासनाने बंद केली.या निर्णयाविरुद्ध मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मुलींसाठी शाळेची गरज मा.न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने मा.उच्च न्यायालयाने त्यास मान्यता दिली. संस्था पदाधिकारी ,ग्रामस्थ व पालक यांची खंबीर साथ असल्याने ज्ञानदानाचा हा यज्ञ अविरतपणे चालु राहिला. मवेशी येथेही माध्यमिक विद्यालय सुरू केले,त्याच्या मान्यतेसाठीही मा.उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. आज राजूर येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व मवेशी येथे श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय सुरू झाले. व आज स्वतःच्या दिमाखदार इमारतीमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.या संस्थेच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर क्रीडा व विज्ञान प्रदर्शनात नैपुण्य मिळविले.कालांतराने इंग्लिश मीडियम स्कुल बंद करण्याचा कटू निर्णयही घ्यावा लागला. असा शैक्षणिक विस्तार करून आपले शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले. आदिवासी भागातील उपक्रमशील शाळा करण्यासाठी रात्रंदिवस ध्यास घेऊन विविध अधिकारी, उद्योजक ,प्रतिभावान महिला यांची व्याख्याने आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक प्रेरणा भरण्याचे काम अविरत चालू आहे .दरवर्षी 1000 विद्यार्थी शिक्षण घेत असून गरीब विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेतून त्यांना शालेय साहित्य,गणवेश व जेवण देण्याचे काम करतात. विद्यार्थी मार्कवंत होण्याबरोबरच गुणवंत होतीलच या पद्धतीने शाळेचा आराखडा तयार करण्यावर भर असतो. सामाजिक कार्यात विशेष योगदान असणाऱ्या व मैलाचे दगड ठरलेल्या या व्यक्तिमत्वांचा संस्थेच्या मार्फत दरवर्षी समज "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरव केला जातो.यामुळे कार्य करणाऱ्यांना ऊर्जा मिळते. विद्यार्थी व समाजाला निश्चितच प्रेरणा मिळते . एका पिढीचा सत्कार्याचा वसा पुढच्या पिढीला समजून तो संक्रमित केला जातो. स्वर्गीय अपर्णाताई रामतीर्थकर ,पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ अनिल सहस्रबुद्धे ,प्रा. प्रकाश टाकळकर ,गिरीशजी कुलकर्णी, निसर्ग संगोपीनी हेमलताताई पिचड अशा अनेक मान्यवरांना त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे गौरविण्यात आले आहे. कुरकूटवाडी ते त्र्यंम्बकेश्वर पायी दिंडी त्यांचेकडे एक तपापासून (१२वर्षे)येत असून त्यांना भोजन,निवास, व्यवस्था ते करतात असे असले तरी एक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि बापूंच्या मागे प्राचार्या सौ मंजुषा वहिनी अविरत व खंबीर पणे त्यांच्या पाठीमागे उभ्या आहेत ,अनेक संकटे आली मात्र बापू डगमगले नाही त्याचे कारण त्यांच्या सौभाग्यवती होय .सामाजिक बांधलकीतून हे कुटुंब काम करते. दोन मुले इंजिनीअर पदवीधर असून त्यांना कन्या रत्न नसले तरी शाळेतील गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शाळेचा गणवेश खर्च करतात,त्यांच्या या कार्यास सलाम. तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्या माध्यमातून ही गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली. राजूर तेली समाजाचे ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. अकोले तालुका तेली समाज सल्लागार,अकोले तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष व माजी सचिव, संगमनेर अकोले पत्रकार संघ सदस्य,नगर जिल्हा पत्रकार संघ सदस्य,राजूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अशा विविध पदांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडीत आहे. नगर जिल्ह्यातील समाजातील अग्रगण्य व्यक्तीमत्व असून समाजहित जपणारे पत्रकार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील एक समाजसेवक, शिक्षण पंढरीचे वारकरी ,अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा हक्काचा माणूस, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, वाळवंटातही बाग फुलविण्याचे स्वप्न पाहणारे सकारात्मक व्यक्तिमत्व, विधायक कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थी हितासाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणून बापूंनी आपली ओळख निर्माण केली आहे. समाजहितासाठी "कुसुमादपी कोमलानी "तर अन्यायाविरुद्ध "वज्रादपी कठोराणि" या भूमिकेत बापूंनी स्वतःला ढाळून घेतले आहे. माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. काही चांगले, काही वाईट काही ,कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले तुम्ही एक..! म्हणूनच आपणास वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या हार्दिक शुभेच्छा

Thursday, February 22, 2024

आदरणीय मंजुषाताई,

taluka FRIDAY, MAY 28, 2021 मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे "दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मेसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥" - संत ज्ञानेश्वर माऊली आदरणीय मंजुषाताई, आपणास आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा 'संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार' प्रदान करताना संस्थेला अतिशय आनंद होत आहे. ताई आपण आपली आवश्यक अशी एम.ए., एम.एड. अर्हता प्राप्त करून; आदिवासी भागात शिक्षिका म्हणून सेवा करण्याचे असिघाराव्रत घेतलेत. गत पंचवीस वर्षांपासून आपण 'श्री स्वामी समर्थ सेवा संस्था' संचालित 'समर्थ कन्या प्रशाला' या संस्थेत राजूर येथे सेवारत आहात. त्याचबरोबर आपण त्या संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असून; आपल्या आदिवासी मुली व महिला यात शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाचे काम करीत आहात. आदिवासी भागातील नापास झालेल्या मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी पुन्हा शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम आपण सुरू केलेत. आदिवासी भागात असे काम करणे हे अतिशय अवघड कार्य होते. या प्रयत्नांतूनच आपण सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनाची, राष्ट्रीय दृष्टी असलेल्या, सेवाभावी, धुरीण कार्यकर्त्यांच्या सकारात्मक सहाय्याने; संस्थात्मक कार्यास सुरुवात केलीत. गाईच्या गोठ्यात बीस विद्यार्थिनींना घेऊन सुरू केलेल्या कार्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता एक हजार कन्या या विद्यालयाचा लाभ घेत आहेत. हे केवळ आपली सेवावृत्ती, जिद्द आणि चिकाटी यामुळेच शक्य झाले आहे. या शैक्षणिक कार्याबरोबरच आपण हुंडाबंदी, बालविवाह प्रतिबंध, युवती सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, पर्यावरणपूरक कार्यक्रमांतर्गत पाणी बचत कार्यक्रम, लेक वाचवा लेक शिकवा, महिला प्रबोधन व सक्षमीकरण मेळावे, संस्कारवर्ग अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून; सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय प्रश्न सोडवणूक; असे महत्त्वाचे कार्य करीत आहात. आपण राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, बालविवाह प्रतिबंध यासाठी प्रबोधक व्याख्याने, या गोष्टी करण्यात पुढाकार घेतलात. कोणतीही शिक्षणसंस्था आणि त्यातील आचार्य, प्राचार्य ह्या व्यक्ती केवळ व्यवसाय म्हणून कार्य करीत नसतात; तर 'विश्व मोहरे लावावे' यासाठीचा सेवा व प्रबोधनाचा यज्ञ करीत असतात. या सेवाव्रताचा आपण वस्तुपाठ आहात. समाजाने शासनाने आपल्या या ध्येयनिष्ठ सेवाकार्याची नोंद घेऊन आपल्याला मार्गदर्शक, प्रबोधक आणि उपक्रमशील प्राचार्य म्हणून गौरविले आहे. आपले जलसंधारणाचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे. याशिवाय आपण राष्ट्रीय वृत्ती जोपासण्यासाठी पालक समुपदेशन, गडकोटकिल्ले स्वच्छता अभियान, इफ्तार पार्टी आयोजनातून सामाजिक समरसता संदेशन, शालाबाह्य विद्याथ्र्यांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे कार्य, वाचन संस्कृती अभिवृद्धी ही वैशिष्ट्यपूर्ण कार्येकरीत आहात. आदिवासी भागात हे कार्य करणे म्हणजे सत्वपरीक्षा होय. आपण ह्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झालातच. इतरांनाही या कार्यात जोडता आहात. माणूस घडविण्यासाठीचे ऋषीकार्य आपण करीत आहात. आपल्या द्या, उपेक्षित आणि वंचितांसाठीच्या कार्यास अभिवादनपूर्वक संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार देऊन गौरवितांना, हे सन्मानपत्र प्रदान करीत आहोत. आपल्या पुरस्कार स्वीकृतीने पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे. अभिनंदन आणि आभार

Tuesday, November 14, 2023

वैभव २०२४

2024 ची आशा-
वैभवराव पिचड ...गत विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात मोठा राजकीय बदल झाला.या बदलामुळे तालुक्यातील लोकांच्या आशा-अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या मात्र दीड दोन वर्षातच तालुक्यातील लोकांचा भ्रमनिराश झाला.भावनेच्या भरात मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या कडून चूक झाल्याचे आता अनेक जण बोलून दाखवीत आहे.तालुक्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे.2024 साठी लोक पुन्हा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या कडे अपेक्षेने पाहू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक सर्वसामान्य माणसांनी,कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत प्रचार केला.विकासाला मोठी गती मिळेल या अपेक्षेने बदल घडून आणला.निवडणूक प्रचारातील लहान मोठ्या आश्वासणांना लोक भुलले.पण आता वास्तवाची जाणीव झाल्यानंतर चूक झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.गावोगाव ग्रामसभेत लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत.गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांना अवैध व्यवसायावर हल्ला बोल करावा लागला.स्वतःच्या गावातील पोलीस ठाण्यात कुणीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचा अनुभव दस्तुर खुद्द लोक प्रतिनिधींना आला.अकोलेची एम आय डी सी लिंगदेव च्या घाटातच अडकली.तीन वर्षात तालुक्यात साधा बंधारा झाला नाही की वीज वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण झाले नाही. निळवंडेचे उच्च स्तरीय कालवे,निळवंडेच्या उड्डाण पूल,32 गाव पाणी योजना अशा अनेक प्रकल्पांची रखडपट्टी सुरूच आहे.कोरोना काळात लोकांचे मोठे हाल झाले.वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले.कोरोना काळात आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा सामान्य माणसाला मोठा आर्थिक फटका बसला.तालुक्यात सुरू असणाऱ्या रस्ते आणि इतर कामांच्या दर्जा बाबत माध्यमांत सातत्याने बातम्या येत आहेत.पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीच आपल्या गावच्या रस्त्याच्या सुरू असणाऱ्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गतवर्षी वेळेवर कारखान्याने ऊस न नेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल ,प्रशासनाकडून अडवणूक होणार नाही,अर्थिक उन्नती होऊ शकेल असे कोणतेही काम तीन वर्षात झाले नाही.गावातील रस्ते,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालये,सभामंडप यालाच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही विकास म्हणत ढोल वाजविले जात आहेत. या सर्वांचा परिणाम लोकांच्या मानसिकतेत झाला आहे.माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या कडे लोक पुन्हा अपेक्षेने पाहू लागले आहेत. लोकांना माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची आठवण होऊ लागली आहे.विविध प्रकारे लोक पिचड पिता पुत्रांबद्दलची आपली भावना उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. सत्तेवर असताना सत्तेच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यासाठी सतत आग्रही भूमिका घेणाऱ्या माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सत्ता नसताना विकासाच्या प्रश्नांवर,जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका तेव्हड्याच ताकतीने पार पाडली आहे,पार पाडत आहेत .विकास आणि संघर्ष या दोन्ही भूमिका सहजतेने पार पाडणारे असे राजकीय नेतृत्व तसे दुर्मिळच म्हणावे लागेल . विधानसभा निवडणुकीत वैभवराव पिचड याना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.राज्यातही विरोधी पक्षांचे सरकार आले .पण या पराभवाने ते खचले नाहीत .एक जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका त्यांनी अडीच वर्षे तालुक्यात सक्षमपणे बजावली.तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकार बरोबर केलेला पत्रव्यवहार असो की प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या लहान मोठ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष असो,यातून दिसली ती जनहिताची तळमळ,आता राज्यातील सत्ता बदलानंतर त्यांची भूमिका बदलली आहे. 2019 नंतर त्यांचे अनेक जेष्ठ सहकारी त्यांना सोडून सत्ताधारी पक्षात गेले .पण या राजकीय वावटळीतही ते ठाम पणे उभे होते .कार्यकर्त्यांना धीर देत विचलित न होता ताकदीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले .त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचेवर नाराज असणारी तरुणाई पुन्हा त्याच्या जवळ येऊ लागली आहे .गावोगाव त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होतांना दिसत आहे. नम्र स्वभाव,अंगी सुसंस्कृतपणा, मात्र अन्यायाविरुद्ध लढा देणारा म्हणून त्यांनी आपली ओळख संपूर्ण तालुक्यालाच नव्हे तर राज्याला करून दिली. प्रत्येक गावातील त्यांचा संपर्क व संवाद हा सध्या त्यांचा उत्साह वाढविणारा दिसत आहे.त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहाने सक्रिय झालेले दिसत आहे. मागील अडीच वर्षात विरोधी सत्ता असतांना तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला,राजकारणात ते एकटे पडले,पण खचले नाही.अगस्ती कारखाना निवडणुकीत त्यांना फटका बसला तरीही न डगमगता अमृतसागर दूध संघात एकहाती सत्ता आणून टायगर अभि जिंदा है हे दाखवून दिले. अकोले नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा त्यांनी एक हाती विजयश्री खेचून आणली.अनेक विकास सोसायट्या त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या.यापूर्वी ते कधीही सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हते पण यावेळी त्यांनी त्यात आवर्जून लक्ष घातले.आणि सोसायट्या वर वर्चस्व मिळविले. पुढील जिल्हा बँकेचया निवडणुकीत याचा त्यांना निश्चितच लाभ होणार आहे.महानंदा च्या संचालक पदावरही त्यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे पुन्हा एकदा राज्य पातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कोरोनाच्या काळात तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले, रुग्णांना,गरिबांना,आदिवासी बांधवाना मदत केली.त्यांच्या विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार करीत तत्कालीन सरकारलाही निर्णय घेण्यास भाग पाडले. जे काम विद्यमान आमदाराने करणे गरजेचे असताना ती कामे माजी आमदार पिचड यांनी मार्गी लावली. तालुक्याच्या दृष्टीने जी विकास कामे प्रलंबित आहे,होणे गरजेचे आहे त्याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, विरोधी पक्षनेते, संबंधित विभागाचे मंत्री,सचिव,जिल्हाधिकारी, इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांचे कडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. आता राज्यातील सत्ता बदलानंतर यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील यात संदेह नाही.त्यांच्या या धडपडी मुळे जनतेमध्ये त्यांचे बद्दल ची आपुलकी वाढत चालल्याचे दिसत आहे. त्यांच्या संघर्षाची व आदिवासी समाजासाठी असलेली तळमळ पाहून भाजप पक्षनेतृत्वाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला. भाजपच्या कारकिर्दीत पहिल्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास संधी मिळणारे पिचड हे एकमेव अपवाद असतील.त्यांच्या वर एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निरीक्षक पदाची जबाबदारी येणार होती,मात्र पिचड यांनी भाजप ची कार्यप्रणाली,विचारधारा समजून घेऊन मला काम करू द्या, असे म्हणत मोठी संधी त्यांनी नम्रपणे नाकारली . दिल्ली येथील पक्षाच्या पहिल्याच मिटिंग मध्ये त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली.त्यांनी आपली निवड सार्थ ठरविली आहे. तालुक्यातील राजकीय घडामोडी त्यांना त्रासदायक ठरतात की,अशी शंका सर्व सामान्य जनतेच्या मनात येत होती.मात्र ज्यांनी साथ सोडली ते पाहून वैभवराव पिचड यांनी सर्व जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना धीर दिला.मी खंबीर आहे.असा विश्वास दिला. व पहाता पहाता तरुणाई ने त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि गावोगावचे युवक, महिला यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आम्हीं तुमच्या बरोबर आहोत असा पाठींबा दिला.तालुक्यात भाजप पक्ष रुजनार नाही अशी चर्चा होत असताना प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसायला लागले.जे सोडून गेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन युवक एकत्र आले. आणि गावागावात भाजपच्या शाखा सुरू व्हायला लागल्या.नवीन जोश भाजप कार्यकर्त्यांनी आणला. त्यांचे नेत्तुत्व मान्य करीत असल्याचे वातावरण तालुक्यातील जनता पाहू लागली.विरोधकावर टीका करताना कधी पातळी सोडून बोलले नाही.मोठ्यांना सन्मानाने वागणूक देणे ही त्यांना त्यांच्या आई वडिला कडून मिळालेली शिकवण जनतेला दिसू लागली. सर्व कार्यकर्त्यांना मानाने वागणूक देणारे नेत्तुत्व त्यांच्या रूपाने तरुणांना आकर्षित करू लागल्याचे चित्र दिसत आहे.40 वर्षे काय विकास केला ही जनता विसरली नाही मात्र विरोधी नेते जाणून बुजून राजकारण करत आहेत. हे आता जनतेला हळुहळू कळायला लागले. हे मात्र नक्की, व पुन्हा एकदा तालुक्यात पिचड यांच्या रूपाने आमदार म्हनुन जनता त्यांना विजयश्री मिळवून देईल व पुन्हा नव्या उत्साहात विकास कामासाठी तालुक्यात 'वैभवपर्व' सुरू होईल असा विश्वास भाजपचे कार्यकर्ते व पिचड समर्थक व्यक्त करत आहेत. अमृतसागर दूध संघ निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविली त्यांच्या पारदर्शी व काटकसरी च्या कारभाराला दूध उत्पादकांनी स्वीकारले.मागील 7 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दरवर्षी त्यांनी दूध उत्पादकांना सर्वाधिक रिबेट दिला. कोरोना काळात तसेच लंपी आजाराच्या साथीच्या काळात दूध उत्पादकांना आधार देण्याचे काम त्यांचे मार्गदर्शनाखाली दूध संघाने केले.कर्जबाजारी अससेला दूध संघ कर्जमुक्त करीत उर्जितावस्थेत आणला. दूध संघाच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य सिद्धा केले आहे. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती,विकास सोसायटी वैभवराव पिचड नेतृत्वाखाली ताब्यात आल्या आहेत.भविष्यात होणाऱ्या जि प ,पं स,बाजार समिती, खरेदी विक्री संघ यात योग्य माणसांना संधी देऊन या संस्थाही भाजप ताब्यात घेण्याचे त्यांनी नियोजन केलेले दिसुन येते. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही क्षेत्रात निर्णय घेतांना ते सर्वांगीण अभ्यास करतात. त्यांच्या या अभ्यासपूर्ण गुणांमुळे लहान सहान बाबही त्यांच्या नजरेतून सुटत नाही.त्यांचे हे वैशिष्ट्य अनेक बैठकांमध्ये दिसून येते. त्यांच्या अभ्यासपूर्ण वृत्ती मुळे तसेच पारदर्शी व्यक्तिमत्वा मुळे सध्याच्या शिंदे -फडणवीस सरकार मध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे,त्यांनी सांगितलेले कोणतेही काम मार्गी लागत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा त्यांच्यावर विशेष वरदहस्त आहे.त्यामुळेच माजी आमदार हा शब्द विसरून जनता आता त्यांच्या कडे आमदार म्हणूनच पहात आहे. हीच बाब त्यांना 2024 मध्ये पुन्हा एकदा आमदार करणार आहे.

Sunday, May 30, 2021

जाहिरातीसाठी लेख अकोले (शांताराम काळे )महाराष्ट्रातील थोर विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान हे मधुकरराव पिचड यांचे गुरू. त्यांचे विचार पिचड यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोलाचे ठरले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ते अकोल्यात आले. प्रस्थापित मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, त्यांच्याविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू पिचड यांना तालुक्यातील मातीने व पाण्याने दिले.पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर संपूर्ण तालुका त्यांनी पायी फिरून पिंजून काढला. ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेतले. १९८० मध्ये आमदार झाल्यानंतर तालुक्यातील पाणी शेतीला कसे मिळेल, याचे नियोजन केले. भंडारदरा चाक बंद आंदोलन करून तालुक्याच्या वाट्याला पाणी देऊन पाणीदार नेता अशी ओळख मिळवली .आजही ८०वर्षे पूर्ण होऊनही आपल्या कार्य कर्तुत्वाने समाजमनाला गवसणी घालणारा ८१ वर्षात पदार्पण करणारा तरुण नेता कोरोना काळातही सातत्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी धडपड करताना दिसत आहे .ओसाड उजाड माळ रानावर हिरवाईचे मळे फुलविणारे "भगीरथ "आज ८१ व्या वर्षात पदार्पण करत असताना तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्रिवार मनाचा मुजरा व शुभेच्छा ..... कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मधुकरराव पिचड यांनी पंचायतसमितीचे सभापती म्हणून तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला . त्यावेळी स्वर्गीय दादासाहेब रुपवते , यशवंतराव भांगरे , साठी अमृतभाई मेहता हे दिग्गज तालुक्यात नेतृत्व करत होते मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विधायक राजकीय महत्वकांक्षा जोडीला कार्यकर्ते , मोठा लोकसंग्रह या बळावर मधुकर पिचड साहेब यांनी तालुक्यावर स्वतःची राजकीय पक्कड मजबूत केली. सभापतीपासून सुरु झालेला त्याचा कार्य कर्तृत्वाचा राजकीय आलेख दिवसेंदिवस उंचावतच गेला . आमदार , राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री , विरोधीपक्ष नेते ,पक्षाचे अध्यक्ष ,राज्यातील नव्हे तर देशातील आदिवासींचे मसीहा ,नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्मान केली त्यांना व्यापक समाज मान्यता मिळत गेली . विविध खात्यांचा पदभार सांभाळताना अफाट क्षमतेचे राजकीय नेते असे बिरुद त्यांना लावले गेले . अकोले तालुक्यात निळवंडे प्रकल्पाच्या उभारणीचा अगस्ती साखर कारखाना , अमृतसागर दूध संघ ,कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ,या संस्थांच्या उभारणीत त्याचे अतुलनीय योगदान आहे . टिटवी , घोटी शिलवंडी , बलठन ,येसार्थव , पिंपळगाव खांड , अंबित असे छोटे मोठे २४ जलाशय प्रकल्प उभारले त्यामुळे अकोले तालुक्यातील उजाड , ओसाड शिवार समृद्धीने फुलविण्याचे काम या जलदूताने "भगीरथाने" केले आहे .अकोले तालुक्याच्या ओसाड जिरायत शेत जमिनीला पाणी उपलब्ध करून बागायती बनवून शेकडो शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनविण्याचे ऐत्यासिक काम मधुकरराव पिचड साहेबांच्या खात्यावर जमा आहे . पिचड दूरदृष्टीचा नेता शिक्षण, रोजगार, पाणी, रस्ते अशा प्रश्नांचा पाठपुरावा करून ते तडीस नेण्यासाठी मधुकरराव पिचड यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. आदिवासी विद्याथ्र्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी नवीन इंग्रजी शाळांऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या आश्रमशाळांमध्येच इंग्रजी शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. आश्रमशाळेचे जाळे संपूर्ण राज्यात विणून पिचड यांनी आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शरद पवार यांनी पिचड यांना आदिवासी विकास मंत्रीपदाची संधी दिली. आदिवासींचा स्वतंत्र अर्थसंकल्पही केला. बंद आंदोलन करून हक्काचे पाणी मिळविले. सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत निळवडे धरणाच्या घळभरणीचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांचा ठाम विरोध होता. त्यामुळे हे काम ठप्प झाले होते. या वेळी तत्कालीन मंत्री अजित पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले. ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनी नको होत्या, त्यांना हेक्टरी आठ लाख ८७ हजार ३०० रुपये दराने रोख स्वरूपात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला. हे अनुदान स्वीकारण्यास बहुतेक खातेदारांनी मान्यता दिल्याने पुनर्वसन प्रश्नाची तीव्रता कमी झाली. प्रकल्पग्रस्तांना पाणी परवाने देण्याचेही मान्य करण्यात आले. एक जूनला पिचड यांचा वाढदिवस याच दिवशी निळवंडेच्या घळभरणीच्या कामास प्रारंभ झाला. धरणात पाणी साठविण्याचा मार्ग मोकळा झाला. अकोल्याच्या इतिहासात नोंद व्हावी, अशीच ही बाब ठरली. या पाण्यामुळे राजूर- पिंपरकणे या रस्त्यांचा काही भाग धरणात बुडणार आहे. आदिवासी भागाचे केंद्र असणाऱ्या राजूर गावाशी असणारा १४ गावांचा संपर्क त्यामुळे तुटणार आहे. हा संपर्क सुरळीत राहावा, यासाठी जलाशयावरून जाणारा उड्डाणपूल पिंपरकणे येथे बांधावा, अशी या गावातील लोकांची, तसेच प्रकल्पग्रस्तांचीही मागणी होती. मधुकरराव पिचड हेही यासाठी आग्रही होते. त्यामुळे सरकारने ३० कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या या पुलास मंजुरी दिली आहे. प्रकल्प खर्चातूनच हा पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. धरणाच्या पाण्यावरून जाणारा हा अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल तालुक्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नांमुळे वाड्या वस्त्यांवर वीज पोचली. १३ मध्ये ५२ वाड्यांवर १ कोटी ५२ हजार, २०१३-१४ मध्ये ३० वाडयांना १ कोटी २९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. राजूर येथील वीज उपकेंद्राच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली या उपकेंद्रासाठी महसूल विभागाने जागाही हस्तांतरित केली आहे.या वीज केंद्रामुळे तालुक्यातील पश्चिम भागात वाडी वस्तीवर सतत वीज मिळत असल्याने आदिवासी खुश आहेत.समशेरपूर, कोतूळ, सांगवी, पाडाळणे या उपकेंद्रांनाही मंजुरी मिळाली . पिचड यांना राष्ट्रवादी पक्षाने राज्याची जबाबदारी दिली होती. ही सर्व जबाबदारी संभाळून त्यांनी तालुक्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आदिवासींचे शोषण रोखून पारदर्शक पद्धतीने त्यांना विकासाची संधी देण्यासाठी पिचड यांनी निर्णयाचा धडाका सुरू केला. खावटी कर्जाची पद्धत बंद करून आदिवासींना बँकेच्या खात्यातून या कर्जाची रक्कम देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पिचड यांनी घेतला. तसेच, आदिवासी आश्रमशाळांना यापुढे खुल्या बाजारातून शिधा खरेदी करण्याची पद्धतही बंद करण्याचा निर्णय घेतला. 'पिचड पॅटर्न' मधुकर पिचड यांनी राज्यात सुरू केल्याची भावना आदिवासी आमदार व्यक्त करत आहेत. राज्यातील आदिवासी आश्रमशाळांना यापुढे सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या माध्यमातूनच शिधा खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे अपहाराला आळा बसला आहे. १९८० साली जिल्ह्यातील व तालुक्यातील पुढारी मधुकरराव पिचड यांना तिकिट मिळू नये म्हणून प्रयत्न करीत होते. मात्र पिचड थेट दिल्लीला पोचले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. गांधींनी मुलाखतीत त्यांना आणिबाणीच्या काळात कुठे होता, असे विचारले, तेव्हा पिचड यांनी विसापूर जेलमध्ये असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे तिकिट निश्चित केले. वसंतदादा पाटील यांनी पिचड यांना मंत्रीपदाची संधी दिली. भंडारदरा चाकबंद आंदोलनाच्या वेळी सरकारने त्यांच्यावर खटले भरले. ते खटले काढण्याचे काम वसंतदादा यांच्यामुळेच झाले.स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची ओळख आहे . गेली चार दशके अकोल्याच्या सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , सहकार , शेती जीवनाशी एकरूप झालेले मधुकर पिचड ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहे मात्र शरीर थकले असले तरी मानाने ते थकलेले , खचलेले नाही आजारपणाशी ते यशस्वी लढा देत अकोल्याच्या समाज जीवनाशी ते आजही एकरूप आहेत कोव्हीड च्या काळात तालुक्यातील नागरिकांना , रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी ते बसल्या जागेवरून ते प्रयत्न करत आहेत .

Monday, May 24, 2021

वाडीत जायला रस्ता नाही..प्यायला पाणी ? तेही नाही. वीज कधी येते कधीही जाते

राजूर२४: एकविसाव्या शतकाकडे प्रवास करताना एका गावाची व्यथा ऐकल्यावर तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही वाडीत जायला रस्ता नाही..प्यायला पाणी ? तेही नाही. वीज कधी येते कधीही जाते रहिवासी अनामिक दहशतीखाली परतनदरा वाडीची ही करुण कहाणी रोजचे जगणे अवघड करणाऱ्या अडचणीमुळे काही कुटुंबे शेतीवाडी सोडून स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत .तालुक्यातील सत्तर वर्षे उलटूनही ही वाडी पिण्याच्या पाण्याची वाट पाहत आहे. तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीत तेथून तीन किलोमीटरवर परतनदरा वाडी आहे.पंचवीस घराच्या वाडीत सव्वाशे दिडशे लोक राहतात या ठाकर वस्तीवर विकासाची पहाट अद्याप उगवायची आहे ,रस्ता नसल्याने वाडीला कोणतेही वाहन जात नाही पाऊलवाटेने जावे लागते त्यात रस्ता अडविला जातो वाडीतील समस्या समजल्यानंतर . तनिष्का व्यासपीठ सदस्या शकुंतला खरात यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरविले मात्र आपल्या अडचणी सांगण्यासाठी पुढे कुणी येण्यास तयार नव्हते मात्र त्यांना विश्वास दिल्याने काही महिला व तरुण यांनी दबक्या आवाजात दादा आम्हाला ना रस्ता,ना पाणी ना स्वस्थ धान्य ना आदिवासी विकासाच्या योजना काटे कुटे तुडवीत तीन किलोमीटर वर कळंब गावात जावे लागते .अजून टँकर सुरू झाला नाही .तर विहिरींना पाणी नाही खडकाळ माळरानावर कसे तरी दिस काढतो . सध्या कोरोना महामारी आल्याने ना रोजगार ना खावटी,जंगलातील कवदर खाण्या शिवाय पर्याय नाही. २०१४ ला शासनस्तरावर पाठपुरावा केला मात्र अधिकारी वर्गाने कागदी घोडे नाचवून हा प्रश्न लाल फितीच्या कारभारमुळे तसाच दाबून ठेवला . ग्रामपंचायतीच्या तेथून ३ किलोमीटरवर पसनदी आहे कळंबसह परतनदरावाडीला चार वर्षांपूर्वी नळयोजना केली होती. ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली. तिथी आजची परिस्थिती सांगता येणार नाही। - वसंतराव डोंगरे, उपअभियंता (लघुपाटबंधारे विभाग) महिलांना तासन् तास थांबून झऱ्यावरून तांब्याने पाणी भरावे लागते. रात्री पाणी भरायचे, दिवसा मजुरी... सध्या वाडीतील लोक ब्राह्मणवाडा आणि पिंपळदरी येथे मजुरीला जातात. कोणत्याही दिशेला जायचे, तर डोंगर तुडवावे लागतात. रात्रभर पाणी भरायचे आणि दिवसा मजुरीला जायचे, एवढेच रहिवाशांना माहीत. घरी कोणी नसल्यामुळे मुले कधीतरीच शाळेत जातात. वाडीसाठी अंगणवाडी बांधली; ती दूर असल्याने मुले जातच नाहीत. गावात सायंकाळी वीज येते आणि पहाटे जाते. बिबटे आणि तरस यांचा वावर नेहमीचाच. शेळ्या व इतर जनावरे घरात किंवा पडवीत बांधून त्यांच्याजवळच झोपावे लागते बचतगटही बंद झाला आशाबाई खंडे, भोराबाई खंडे, सुरेखा खंडे, कौशाबाई खंडे आदी ११ महिलांनी बचतगट सुरू केला; तोही बंद झाला. आदिवासी विकास विभाग दर वर्षी भाऊबीज अनुदान म्हणून महिला बचतगटाला १० हजार रुपये देतो. इथल्या महिलांपर्यंत ही योजना पोचलीच नाही. वाडीत शासनाचा व आदिवासी विकास विभागाचा एक पैसाही आजवर आला नाही. पंचायत समितीचे अधिकारीही कधी फिरकले नाहीत. परतनदरावाडीला लवकरच भेट देऊन प्रश्न समजून घेऊन ते तातडीने सोडवू. -संतोष ठुबे (आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी) २०१० ला वाडी साठी नळयोजना केली मात्र ती सुरू होण्यापूर्वी पाणीणीयोजना बंद आहे. रोजगार हमोतून रस्ता केला; तो फुटला आहे. श्रीमती शकुंतला खरात (उपसरपंच कळंब)

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...