Sunday, April 12, 2020

आज पर्यटन व्यवसायावर काळी सावली पसरली आहे.

आज पर्यटन व्यवसायावर काळी सावली पसरली आहे. जगभरावर काळे सावट पसरवणा-या कोवीड-१९, कोरोना व्हायरसमुळे जगभरातील पर्यटनाच्या व्यवसायावर अतिशय वाईट परिणाम होत आहे.
अनेक महोत्सव, ऑलिम्पिक गेम्स, अनेक खेळांच्या स्पर्धा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन या सर्वामध्ये भीतीचे सावट आहे.
फार वर्षापूर्वी माझे एक परिचित डॉक्टर मला म्हणाले होते की, एक टीबीचा पेशंट मुंबई लोकलमधील दहा हजार लोकांना टीबीचा म्हणजे क्षयरोगाचा धोका देऊ शकतो. गर्दी, अस्वच्छता, दाट लोकसंख्या, गरम हवा या कारणांमुळे कोणताही जंतुसंसर्ग, साथीचा आजार लवकर पसरतो. श्वास घेणे तर आवश्यक असते. बाहेर खाणे टाळता येते. स्पर्श करणे टाळता येते, पण हवेतून होणारे जंतुसंसर्ग टाळणे सोपे नसते.
सहलीच्या वेळी आजारी पडणा-यांची संख्या मोठी असते. मनात धाकधूक, खरी-खोटी भीती असेल, तर सर्दी-खोकला झाला तरीही मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात.
अनोळखी ठिकाणी परगावी परराज्यात आणि परदेशात तर त्याहून अधिक हानीची, प्रकृती बिघडणे, आजारपणाची अनामिक भीती वाटते. हवापालट खाण्या-पिण्यातील फरक, अन्य लोकांशी सहवास, वेगळे वातावरण यामुळे व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
कोरोना व्हायरसमुळे आज पर्यटन व्यवसायात खूप मोठे संकटाचे सावट पसरलेले आहे. नवीन टूर्स बुक करायला प्रवासी घाबरत आहेत. ज्यांनी अर्धे पैसे भरले आहेत, ते पुढचे पैसे न भरता टूर रद्द करत आहेत. पैसे गेलेले परवडले, पण आजार अपमृत्यू नको. ‘जान है तो जहान है’ असं म्हणून परदेशी वारी रद्द करणारे प्रवासी देखील आहेत.
इटली, युरोप, अमेरिका, जपान, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या सात परदेशी टुर्स साधारणपणे एप्रिल ते जुलै या दरम्यान नेहमीच ओव्हरफुल्ल जातात. प्रवासी कंपन्यांचा व्यवसाय चार महिन्यांतच प्रामुख्याने जोरात चालतो.
परदेशी प्रवासासाठी हा काळ सुयोग्य असतो. परीक्षा हवामान या दृष्टीने या चार महिन्यांत होणा-या धंद्यावर यावेळी कोवीड-१९ व्हायरसमुळे वाईट परिणाम झाला आहे.
अनेक देशांत अशी सूचना जाहीर करण्यात आली आहे की, काही देशांत काही ठिकाणी अतिशय आवश्यक असेल, तरच प्रवास करावा. अन्यथा त्या देशांमधला प्रवास टाळावा.
मित्र-मैत्रिणींनो परदेशी सहलीला जाणं हे साधारण प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, आज आरोग्याच्या दृष्टीने, साथीचे आजार पसरलेले असताना प्रवास आणि सहली झेपत असतील, तरंच कराव्यात, शक्यतो टाळाव्यात.
इंटरनेटवर देखील इटलीच्या, व्हेनिसच्या, जपान, युरोप टूर्स रद्द केल्याच्या बातम्या येत आहेत.
पर्यटकाला हवा बदलाने सर्दी, खोकला तर कुठेही किरकोळपणे होतो. असा सर्दी खोकला असला, तरी वेगवेगळ्या तपासण्यांना देखील तोंड द्यावे लागू शकते. ज्यामुळे परदेशी प्रवास टाळलेलाच बरा, असे मला वाटते.
विचार करा. विमानतळावर अनेक देशांतून आलेले प्रवासी लोक एकत्र संपर्कात येतात, त्यामुळे विमानतळावरून जंतुसंसर्ग पसरू शकतो का? याबद्दल अनेक वाद-विवाद अनेक पोस्टस आपण वाचत आहोत.
मला एवढेच सुचवायचे होते की, जगभरातील या आरोग्य प्रश्नावेळी, मजा करण्यासाठी, आनंद उपभोगण्यासाठी, परदेशी जाऊन आपण आपल्यावर संकट ओढवून घेत नाही ना? याची आधी मार्गदर्शक माहिती काढावी आणि नंतरच प्रवास करावा. पर्यटनानंतर काही प्रश्न निर्माण झाल्यास जीव आपला आहे, आरोग्य आपले आहे.
आकडेवारीने काहीही सांगितलं, जंतुसंसर्ग पसरतो आहे अथवा नाही किंवा जंतुसंसर्ग कमी झाला आहे. त्या आकडेवारीकडे अभ्यासपूर्वक नजरेने बघा आणि सारासार विचार करून निर्णय घ्या. वैद्यकीय सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या.
पर्यटनाला जात आहात? थांबा! असं म्हणणं योग्य ठरणार नाही, काही अपरिहार्य कारणांनी प्रवास करावा लागत असेल, तर जावे लागत असेल, तर जरूर विचार करावा आणि नंतरच प्रवासाचे बेत आखावेत.
दरवेळीच्या विषयापेक्षा हा विषय वेगळा असला तरी सख्यांनो स्त्री ही माता असते आणि एकाही बालकाचा, मानवाचा, व्यक्तीचा मृत्यू होऊ नये म्हणून, हा आजार पसरू नये म्हणून केवळ ममतेपायी, आज हा लेख.
ज्येष्ठ नागरिक, बालक, गरोदर स्त्रिया, कुपोषित, प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती यांना जंतुसंसर्ग लवकर होत असतो. त्यामुळे सावधान, पुढे धोका आहे.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...