Wednesday, April 15, 2020

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्यद्रीच्या डोंगररांगांतअहमदनगर जिल्ह्यतला अकोले तालुका वसला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सह्यद्रीच्या डोंगररांगांतअहमदनगर जिल्ह्यतला अकोले तालुका वसला आहे. याच तालुक्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा विस्तार झाला आहे. हा परिसर डोंगराळ, निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे. डोंगराच्या कुशीतून जाणारी नागमोडी वळणे, हिरवीगर्द वनराई, अप्रतिम निसर्गसौंदर्य, उंच उंच गिरिशिखरे, मुळा, प्रवरा, आढळा, पावसाळ्यात जागोजागी दिसणारे धबधबे आपल्याला मोहून टाकतात.
निसर्गाने भरभरून दान दिलेला हा प्रदेश केवळ प्रेक्षणीय नाही तर जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संपन्न प्रदेश आहे. मनाला भुरळ पाडणाऱ्या या प्रदेशाने नेहमीच साहसी पर्यटकांना आव्हान दिले आहे. रानवाटांवर प्रेम करणाऱ्या पर्यटकांना येथील वाटांनी नेहमीच खुणावले आहे. ज्याला निसर्गाची आवड आहे त्याला हा निसर्ग अतिशय उत्कटपणे साद घालतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कळसूबाई याच भागात येते. सहय़ाद्रीच्या डोंगररांगातून उगम पावणाऱ्या प्रवरा नदीच्या उगमाखाली भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे. भंडारदरा धरणामुळे निर्माण झालेला सर आर्थर लेक जलाशय आणि त्याच्या सभोवतालचा प्रदेश अनेक प्रजातींच्या पक्ष्यांना आकर्षति करतो. कळसूबाई हरिश्चंद्रगड परिसर महाराष्ट्र शासनाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ नुसार १९८६ साली अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. अभयारण्याचे क्षेत्र ३६१.७१० चौ.कि.मी. आहे. या डोंगररांगांमधूनच प्रवरा आणि मुळा नदीचा उगम होतो. प्रचलित इतर अभयारण्यांप्रमाणे येथे काही वन्यजीव सफारी वगैरे प्रकार नाही.  काही वाडय़ा, वस्ती, गावं या अभयारण्याच्या परिसरात येतात. आणि त्या वाडय़ा वस्त्यांमध्ये नित्य व्यवहार सुरु असतात. वाहतूकही बरीच आहे.
वन्यजीव अधिवासास उत्तम स्थान असलेला हा परिसर जैवविविधतेने अतिशय समृद्ध असा परिसर आहे. येथे हिरडा, आंबा, बेहडा, उंबर, कळंब, सादडा, अर्जुन, आवळा, लोखंडी, धामण, सावर, जांभूळ, बेल, बहावा, मोह, तांबट, चंदन, भूतकेश, अर्जुन सादडा रिठा, गणेर, पळस, पांगारा यांसारखी अनेक प्रजातींची वनसंपदा दिसून येते. कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात बिबळ्या, वाघ, जंगली मांजर, कोल्हा, तरस, भेकर, रानडुक्कर, मोर, मोठे घुबड, वानर, माकडे, शेकरू, सायाळ, सांबर, निलगाय, घोरपड पाहायला मिळते. येथील जलाशयात विविध प्रकारचे मासे आणि कासव आढळून येतात. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी सहज निरीक्षणात येतात. महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेला हरियाल पक्षीदेखील येथे पाहावयास मिळतो.
पावसाळ्यात येथे संततधार असते. हे अभयारण्य मुंबई, नाशिक, अहमदनगर, पुणे या प्रमुख शहरांपासून जवळ असल्याने अभयारण्यास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. कळसूबाई शिखराबरोबर अभयारण्याच्या परिसरात रतनगड, मदनगड, अलंग, कुलंग, कुंजरगड किल्ला हे गड-किल्ले तर रंधा धबधबा, अम्ब्रेला फॉल पाहण्यासारखे आहेत. ही उंच गिरिशिखरे धाडसी मनाला साद घालतात, आव्हान देतात. हरिश्चंद्रेश्वर -अमृतेश्वरासारखी जुनी राऊळं भक्तगणांना प्रिय आहेत. पांजरे बेट, उडदावणे, उंबरदरा व्ह्यू, घाटघर, लव्हाळी व्ह्यू पॉइंट ही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
या अभयारण्य क्षेत्रात हिंदू ठाकर, हिंदू महादेव कोळी या अनुसूचित जमातीचे लोक राहतात. त्यांची लोककला, लोकनृत्ये, पारंपरिक सण, उत्सव ही पाहण्यासारखे असतात. वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज काढण्याची त्यांची कला अफलातून आहे. ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ पर्यटनासाठी उत्तम आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन संकुल, पाटबंधारे विभाग, सावर्जनिक बांधकाम तसेच वन विभागाचे विश्रामगृह ही पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे. भंडारदरा धरण परिसरात खासगी निवास व्यवस्थेची ही सोय आहे.
कसे जाल?
रस्ता मार्ग : मुंबई- नाशिक महामार्गावर घोटी येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी फाटा आहे. मुंबईहून अंतर १८५ किमी. नाशिकहून ७२ किमी.
रेल्वे- मध्य रेल्वेने घोटी हे जवळचे स्थानक आहे. ते ३५ किमीवर आहे.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...