Sunday, April 19, 2020

कलिंगडाच्या खरेदीस व्यापाऱ्यांचा नकार, शेतकऱ्यांना आर्थिक चटके

करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर टाळेबंदीनंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असतानाच आता अवकाळी पाऊसही त्यात भर घालत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. काही भागांत वादळी पाऊस आणि गारपीटही झाल्याने हातातोंडाशी आलेला शेतीमाल, फळबागांचे नुकसान झाले. काढणीची ज्वारी, गहू, हरभरा आणि कांद्यासह द्राक्ष, चिकू, कलिंगड, टरबूज आदींनाही पावसाचा फटका बसला आहे. कोकणामध्ये आंब्यालाही पावसाने तडाखा दिला. राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्याच्या बहुतांश भागामध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये आठवडय़ापासून मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश ते तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होतो आहे. परिणामी राज्यात पुन्हा पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. तीन ते चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात वादळी पावसाने हजेरी लावली.
फळे, पिकांचे नुकसान
सोलापूर जिल्हामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या पावसाने आणि गारपिटीने द्राक्षे, आंबा, चिकू, लिंबू गळून पडले, तर कलिंगड, टरबूज, पपई, काकडी जागेवरच सडून जाण्याची चिन्हे आहेत.ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिकांचेही नुकसान झाले.
उत्तर महाराष्ट्रालाही तडाखा
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, मनमाड, उगाव परिसरात द्राक्ष, गहू, कांदा पिकांना फटका बसला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागातही पावसाची नोंद झाली.
भरपाईची मागणी
नगर जिल्ह्यतील कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या फळबागा, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली.
आंब्यांना फटका
विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने संगमेश्वर आणि लांजा तालुक्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे प्रामुख्याने आंब्यांना फटका बसला असून, अनेक ठिकाणी झाडावरचे आंबे गळून पडले. शनिवारी रात्री देवरूख परिसरालाही पावसाने झोडपून काढले. साखरपा परिसरातही वादळी पाऊस झाला. अनेक घरांचे पत्रे उडाले, तर परिसरात चार ठिकाणी झाडे कोसळल्याने दोन मार्ग बंद झाले आहेत.
पावसाची शक्यता कायम
राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण आणि मराठवाडय़ातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २० एप्रिलला संपूर्ण राज्यात आणि प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रात्रीच्या उकाडय़ात वाढ  राज्यामध्ये सध्या पावसाळी स्थिती निर्माण झाली असली, तरी दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील वाढ कायम आहे. दिवसाचे कमाल तापमान अनेक ठिकाणी सरासरीच्या पुढे आणि ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. रविवारी नाशिक येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...