Saturday, April 18, 2020

स्त्रियांना, एका ठरावीक वयानंतर घरी रिकामं वाटू लागतं. त्याच दरम्यान मुलं शिक्षणाच्या निमित्ताने अथवा परदेशी गेल्यामुळे घर सुनं-सुनं भासू लागतं. मुलांची उणीव भासत असते. याला एम्टी नेस्ट म्हणतात. रिकामं घरटं असे म्हणतात.
पती- पत्नी दोघे जण कायमच आपलं विश्व मुलांभोवती गंफू पाहत असतात. त्यामुळे मुलं बाहेर गेल्यावर, परदेशी-परगावी गेल्यावर घरात करमेना होतं. एक प्रकारची पोकळी जाणवते. पूर्वी तरी इंजिनीअरिंग कॉलेजसाठी मुलांना परगावी राहावं लागे. पूर्वीच्या मानाने आता इंजिनीअरिंगची संख्या वाढल्यामुळे मुलं आई-वडिलांजवळ राहून आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात. तरीही शिक्षण अथवा नोकरीसाठी परगावी राहणा-या मुलांमुळे पती-पत्नींना एकप्रकारे रिकामपण जाणवतं. या रिकामपणावर उपाय काय करावा?
साधारणत: आपली ओळख ‘क्ष’ची आई असते आणि आपल्या पतीची ‘क्ष’चे बाबा अशी असते. आपण आपलीही ओळख बदलायला या वयात जड जातं. अशावेळी कुणाची तरी मित्र, कुणाची तरी मैत्रीण, कुणाशी तरी गप्पा मारणारी, शेजारी अशी नवीन ओळख आपण निर्माण करायला हवी. एखादा छंद लावून घ्यायला हवा.
सेवानिवृत्तीनंतर देखील अतिशय रिकामपण जाणवून हे लक्षण दिसू शकते.नव्या ओळखीत साडी, शर्ट, कपडे देवाण-घेवाण टाळा. काटकसर, भाडे बचत, सहली यांचा अतिरेक नको. मानसिकरीत्या कोणाच्या तरी जाण्यामुळे ही येणारी पोकळी अथवा मुलं शारीरिक रूपात दूर गेल्यामुळे निर्माण होणारी मनाला त्रास देणारी स्थिती यावर उपाय काय करावा.
याबद्दल मानसशास्त्र सांगते, तुमच्या जीवनातील अन्य ओळखीच्या अथवा अन्य कामांची भूमिका यांची यादी करा. आपल्या वेळेचे नियोजन करा आणि स्वत:ला अन्य कुठल्या तरी कामात गुंतवून घ्या.
जसे की, एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करणे, एखादे वेगळे पुस्तक वाचणे, योगासन वर्ग लावणे. एखाद्या संस्थेत अथवा कट्टय़ावर जाणे. एखादी परीक्षा देणे. राहून गेलेल्या बेताखालील डिग्री घेणे. जसे की, कायदाचे शिक्षण अथवा कलेचे शिक्षण घेणे.
रिकामं घरटं ही अवस्था वाईट असते, केवळ ती सोसणारी व्यक्तीच जाणू शकते. बाकीच्यांना सांगितलं तर ते लोक म्हणतात, सुख बोचतंय त्यामुळे आपणच आपल्या मनस्थितीवर उपचार करणं आवश्यक असतं. मुलांचं करता करता, आपण घरात आई आणि दाईच बनलेले असतो. त्यामुळे काय एखाद्या वेगळ्या कुठल्यातरी क्षेत्रात स्वत:ला गुंतवावे. एखाद्या सहलीला, यात्रेला जावे, आपले मूल आता मोठे झालेय, आपल्यात नाही अन्य कुठे तरी आहे. मुलापासून दूर राहणे, हा पण तो त्याच्या भल्यासाठीच घेतलेला आपला निर्णय आहे. अथवा विद्यार्थ्यांचाच तो निर्णय आहे, हे जाणून नवीन कामात स्वत:ला गुंतवून घ्या.
पटकन या रिकाम्या घरटय़ाच्या भावनेतून बाहेर पडणं सोप नाही. पण, प्रयत्न करा, मैत्रीतून विचार प्रकट करा. मन मोकळं करा. गप्पा मारा.
सामान्य माणसं कुणालाही मदत करताना फायद्याचा विचार करतात, पण अशी साधी नसलेली अथवा विक्षिप्त माणसं उपयोगी पडतात. नेहमीच नाहीत, मात्र झंझावातासारखी माणसं देखील कधी-कधी माणुसकीला जागतात आणि रिकाम्या घरटय़ात वावरणा-या वृद्धांना मदत करतात.
संकटकाळी मदत मिळणं, अडीअडचणीला एखादा माणूस उभा राहणं, एवढीच या वयात अपेक्षा असते. मात्र, वृद्धांच्या भानगडीत पडायला नको, त्यांची मुलं परक्या गावी असतात.
आपल्यावर जबाबदारीची नको, वगैरे वगैरे कारणाने, सहनिवासी मदत करायला नकार देतात. वृद्ध लोक तर अधिकच एकाकी होतात. मदतीला देखील माणसे धावून जात नाहीत.
ज्येष्ठ नागरिकांच्या एखाद्या संस्थेशी स्वत:ला निगडित करून ठेवावे. अहंकाराचा अति पसारा वाढवू नये, नम्र राहावे. साध्या माणसात वावरावे. आयुष्य असे असते की, जो दिखता है वो नहीं होता है, जो नहीं दिखता है वो होता है, त्यामुळे माणसं, प्रश्न औपचारिक ठेवा. स्वत:ला ग्रेट समजू नये. राजकीय कारणाने तू अमूक पक्षाचा, मी तमूक पक्षाची, तो असा ग्रेट, मी हा असा, अशी भांडणे वाढवण्याची काहीच गरज नाही. नातेसंबंध जपावे. रिकामं घर हा जीवनाचा अविभाज्य भाग असतो, मात्र छंद आणि परिचयातील लोक यांच्या मदतीने रिकाम्या घरटय़ात भावभावनांच्या पोकळीतील वाईट काळाशी तडजोड करता येते.
आकाशी झेप घेतलेल्या पाखरांना उडू देत, तुम्ही रिकाम्या घरटय़ातही स्वत:चं अस्तित्व निर्माण करा. खूश राहा.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...