Tuesday, May 19, 2020

पूरक उद्योगासाठी बहूपयोगी वृक्ष - मोह

पूरक उद्योगासाठी बहूपयोगी वृक्ष - मोह

मोहाच्या बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल आणि 16 टक्के प्रथिने आहेत. तेलाचा उपयोग त्वचारोगावरील औषधे, साबणनिर्मिती, इंजिन ऑइल म्हणून होतो. या वृक्षाचे फायदे पाहता यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. 

मोहाच्या झाडाला आदिवासी लोक कल्पवृक्ष मानतात. या वृक्षाचे मूळ स्थान भारत आहे. मोहाला वसंतऋतूत फुले लागतात. पानझडी वनस्पतींमध्ये वृक्षवर्गात याचा समावेश होतो. हा वृक्ष पर्णझडी मिश्र जंगलामध्ये नद्या- नाल्यांचे काठ, शेताचे बांध इ. ठिकाणी आढळतो. उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओरिसा, बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या डांग भागात कमी-अधिक प्रमाणात हे वृक्ष आढळतात. या वृक्षाची लागवड मुद्दामहून काही ठिकाणी करण्यात आली आहे. राज्यात ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, रायगड, विदर्भ इत्यादी ठिकाणी मोहाची झाडे आढळून येतात. ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व मुरबाड तालुक्‍यांतील लोक उन्हाळ्यात येथील मोहाची फुले, बिया गोळा करून त्याची स्थानिक पातळीवर विक्री करतात किंवा तेल काढतात. 

आर्थिक महत्त्व - 
1) वनसंवर्धनासाठी उपयुक्त वृक्ष. 
2) बियांमध्ये सुमारे 45 ते 50 टक्के खाद्य तेल, 16 टक्के प्रथिने. 
3) मोहाच्या तेलाचा उपयोग त्वचारोगावरील औषधे, साबणनिर्मिती, इंजिन ऑइल म्हणून होतो. 
4) पेंडीचा उपयोग शेतीला सेंद्रिय खत व कीडनाशक म्हणून होतो. 
5) झाडाची साल औषधी आहे. लाकडाचा उपयोग इमारती व इतर कामांसाठी होतो. 

शास्त्रीय माहिती - 
1) कूळ - सॅपोटॅसी 
2) शास्त्रीय नाव - मधुका इंडिका आणि मधुका लॉन्जिफोलिया. 
3) मोहाचे झाड हे द्विदल प्रकारातील आहे. झाड अतिशय जलद गतीने वाढते. झाडाची उंची साधारण 15 ते 20 मीटर असते. घेरही मोठा असतो. 
4) झाडाची मुळे जमिनीत खोलवर जातात. खोड मजबूत व टणक असते. पाने लंबगोलाकार, फांदीच्या शेंड्याला गुच्छाने फुले येतात. 
5) झाडाला 8 ते 12 वर्षांनंतर फळे यायला सुरवात होते. फुले येण्याचा कालावधी फेब्रुवारी ते एप्रिल महिना आणि फळे येण्याचा कालावधी एप्रिल ते जून महिना असा आहे. 

झाडाचे विविध उपयोग - 
मुळे - 
मुळांचा उपयोग अल्सरच्या आजारावर करतात. 

लाकूड - 
1. लाकूड चांगले टणक ,मजबूत आहे. वाळवी लागत नाही, पाण्यातही कुजत नाही. लाकडाचा उपयोग घरकाम, फर्निचर, लाकडी खेळणी, तसेच कृषी अवजारे बनविण्यासाठी करतात. 
2. लाकडाचा उष्मांक चांगला असल्याने जळण म्हणून उपयोगी. 
3. लिखाणाचे कागद, प्रिंटिंग पेपर बनविण्यासाठी लाकडाचा लगदा वापरतात. 

साल - 
1. खोडाच्या सालीचा काढा हिरड्यांमधील रक्तस्राव, तोंडाचा अल्सर आजारात उपयुक्त.
2. आतड्याच्या जखमांवर, तसेच आंतरिक रक्तस्राव थांबविण्यासाठी उपयोग. 
3. रंगनिर्मितीमध्ये खोडाच्या सालीचा उपयोग. 

पाने - 
1. आयुर्वेदिक औषधांमध्ये त्वचारोगावर पानांचा वापर होतो. 
2. जनावरांना खाद्य, तसेच खत म्हणून उपयोगी. 
3. पत्रावळी बनविण्यासाठी उपयुक्त. 

फुले - 
1. भाजी व खाद्यपदार्थ बनविण्यासाठी उपयोग. फुलांच्या पाकळ्यांत नैसर्गिक शर्करा व जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची उकडून भाजी केली जाते. 
2. भरपूर ग्लुकोज असणारी ही फुले वाळवून भाजून किंवा नुसती वाळवूनही खातात. ही वाळविलेली फुले किशमिशसारखीच पौष्टिक आणि रुचकर असतात. 
3. फुलांपासून व्हिनेगार, अल्कोहोल व त्यापासून इंधननिर्मिती. 
4. मोहांच्या फुलांचा मध इतर मधापेक्षा गोड असतो. 
5. फुलांच्या रसाचा वापर कफ व अस्थमा या श्‍वास रोगांत, चेतासंस्थेच्या आजारात होतो. 
7. संग्रहणी आणि आम्लपित्तांच्या रोग्यांनाही मोहाचे फूल उपयोगी आहे. 

फळे - 
1. पक्षी व वटवाघळांचे आवडीचे खाद्य. 
2. फळांचा उपयोग शिकेकाईबरोबर केस धुण्यासाठी. 
3. फळे शुक्रवर्धक, बल्य आणि शीतल आहे. 
4. फळांचा भाजीसाठी उपयोग करतात. 

बिया - 
1. तेलनिर्मितीसाठी बियांचा उपयोग. 
2. बियांपासून तयार केलेले मलम त्वचा उजळ होण्यासाठी वापरतात. 
3. बियांपासून सुगंधी तेल मिळते. 

तेल - 
मोहाचे ताजे तेल पिवळ्या रंगाचे दिसते. नंतर ते हिरवट पिवळ्या रंगाचे होते. या तेलाची चव काहीशी कडवट लागते. तेल खाण्यासाठी वापरण्यापूर्वी आदिवासी लोक हे तेल चांगले तापवून घेतात, यामुळे त्यातील कडवट तत्त्व निघून जाते. थंड झाल्यावर नंतर साठवून ठेवतात. 
1. खाद्यतेल म्हणून उपयोग. 
2. खाद्यतेल व तुपामध्ये योग्य प्रमाणात मिसळण्यासाठी उपयोग. 
3. साबण बनविण्याच्या उद्योगात उपयोग. 
4. त्वचारोग, पोटाचे आजार, डोकेदुखी, जुनी बद्धकोष्ठता, मूळव्याध, रक्तस्राव थांबविण्यासाठी, डोक्‍याच्या केसांसाठी, शरीराला मालिश करण्यासाठी, ओकारी आणण्यासाठी, स्नायूंचे दुखणे, हाडांचे दुखणे, सांधेदुखी, तळपायांच्या भेगांसाठी गुणकारी. 
5. तेलापासून जैव इंधन. 

मोहाची पेंड - 
1. शेतीसाठी चांगले सेंद्रिय खत 
2. मातीमधील किडी- जसे हुमणी, मुळे कुरतडणारी अळी, खेकडे व सूत्रकृमी यांच्या नियंत्रणावर एक चांगले कीडनाशक म्हणून उपयोग. 
3. भातशेतीत खोडकिड्याचे प्रभावी नियंत्रण. 
4. तलावात मासे सोडण्यापूर्वी स्थानिक माशांच्या नियंत्रणासाठी या पेंडीचा उपयोग करतात. 
5. आदिवासी भागात शिकेकाईप्रमाणे डोक्‍याचे केस धुण्यासाठी पेंडीचा उपयोग करतात. 
मोहाच्या झाडाचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व - 
- मोहाच्या बियांमधील (मोहिटी) तेलाचे प्रमाण 45 ते 50 टक्के. 
- एका मोहाच्या मोठ्या झाडापासून वर्षाकाठी 100 ते 120 किलो बिया आणि 70 ते 80 किलो फुले मिळतात. 
- फुले व बिया गोळा करण्याचा हंगाम एप्रिल ते जून महिना. 
- सुकलेल्या फुलांमध्ये 71 टक्के साखरेचे प्रमाण. 
- एक टन वाळलेल्या फुलांपासून 130 लिटर अब्सलुट (विशुद्ध) अल्कोहल तयार करण्याची क्षमता. 

संशोधनाची गरज - 
1) या बहुउपयोगी झाडावर उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथील नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ येथे संशोधन झाले आहे. या विद्यापीठाने त्या भागात चांगल्या येणाऱ्या मोहाच्या जातींची निवड केलेली आहे. आपल्याकडेही जास्त तेल उतारा असलेल्या मोहाच्या जाती विकसित झाल्यास त्याचा शतेकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. 
2) कोकणामध्ये नैसर्गिकरीत्या वाढलेली मोहाची भरपूर झाडे आहेत. यामधून चांगले उत्पादन देणारे आणि बियामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असणाऱ्या झाडांची निवड करणे गरजेचे आहे. 
3) तेल काढण्याच्या पद्धतीबाबत अद्ययावत तंत्रज्ञान, तसेच कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाबाबत तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे. 
4) मोहाच्या फुलांपासून अल्कोहोलनिर्मिती करून त्याचा इंधनासाठी वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित होणे, तसेच बियांपासून मिळणाऱ्या तेलाचा बायोडिझेल म्हणून उपयोग शक्‍य आहे. 
4. मोहाच्या फुलांमध्ये जास्त असलेले साखरेचे प्रमाण (71 टक्के) लक्षात घेता यापासून प्रक्रियायुक्त पौष्टिक पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. 
5. मोहाच्या बियांपासून तेल काढल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंडीत 19.5 टक्के क्रूड प्रोटीन असते. या पेंडीचा उपयोग जनावरांच्या पशुखाद्यात किंवा बायपास प्रोटीन म्हणून करता येऊ शकतो. 
6. पेंडीचा उपयोग वेगवेगळ्या पिकांमध्ये खत व कीडनाशक म्हणून कसा करता येईल, याबाबत संशोधनाची गरज आहे. 

संपर्क प्रा. उत्तम सहाणे - 8087985890 
प्रा. जगन्नाथ सावे - 9226417046 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू, जि. ठाणे येथे कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment

आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने

अकोले , विनायक साळवे --आदिवासी भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये,त्यांची शैक्षणिक परवड थांबावी या उदात्त हेतूने श्री स्वामी समर्थ महा...